जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे. या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी बीड जल्ह्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी कालच मराठा समाजाला आवाहन केला आहे की, आपण शांत राहायचं आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा. अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती.
असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार
या राज्यातल्या मराठा समाजाला माझं सांगणं आहे की, जितके मराठा समाजाचे राज्यातील नेते आहे त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. ओबीसीचे नेते, हिंदू मुस्लिमांच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. आज माझ्यावर वेळ आली आहे म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आली की आम्ही मजा बघायची हे नको. कोणाचं तरी ऐकून एखाद्याच्या जीवावर उठायचं. करणाऱ्या पेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार आहे. आज माझ्यावर बितली उद्या तुमच्यावरही बितू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घ्या. आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
मनोज जरांगेंनी सांगितला घटनाक्रम
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आता घडलेला घटनाक्रम सांगतो. शंभर एक जण बीड आणि जालना जिल्ह्यातले सर्व पक्षाचे लोक असलेले होते. त्यामुळे जनतेच्या प्रशासनात खरं काय आहे ते सर्वांना माहिती आहे. बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए आहे. तो या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचे आहे आणि इथून सुरुवात झाली. पहिले त्यांच्याकडून खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचं ठरलं होतं. मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले की यांचा खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावर आले की, आपण गोळ्या किंवा औषध घेऊन मग घातपात करू.
मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील
बीडचा कांचन पाटील नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचनाचे काम केले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले. तिथे एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडे यांनी सोडली आणि यांच्याकडे गेले. त्यांची वारंवार धनंजय मुंडेंशी भेट व्हायची. कांचन पाटील आणि धनंजय मुंडे यांची 20 मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.